Lok Sabha Election 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती मात्र राज ठाकरे यांची ही भूमिका पक्षातील प्रमुख नेत्यांना तसेच पदाधिकारी यांना आवडलेली दिसत नाही आहे.
मागील काही दिवसांपूर्वी,पनवेल मधील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. कोकणातील मनसे संपवण्याचे काम करणाऱ्या सुनील तटकरे यांचे काम आम्ही कसे करु अशी भूमिका सरचिटणीस वैभव खेडकर यांनी जाहीरपणे मांडून कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर आता पक्षाचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.
या पूर्वीही राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भूमिकेनंतर मनसेच्या सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला. ‘अलविदा मनसे’ म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनी मनसेलाअखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं आणि आज अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी राजसाहेबांनी भूमिका बदलली, असे किर्तीकुमार शिंदे यांनी म्हटलंय.
दरम्यान,मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बिनशर्त पाठिंबा’ जाहीर केल्यानंतर मनसेतील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाकडे ओढा वाढू लागला आहे. दादर येथील शिवसेना भवन मध्ये ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली असून स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत करीत आहेत.