भुवनेश्वर- ओडिशातील संबलपूर येथील खासदार नितेश गंगा देव यांच्या पत्नी अरूंधती देवी आणि मुलगा नमन गंगा देव यांनी नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल पक्षात प्रवेश केला आहे. पश्चिम ओडिशाच्या देवगढ येथील राजघराण्याशी संबंध असणारे हे देव कुटुंब भाजपवर नाराज होते. नितेश देव यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, त्यांना तिकिट मिळाले नाही.
एवढेच नाही तर विधानसभेच्या उमेदवारीसाठीही त्यांचा विचार केला गेला नाही. भाजपने येथून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना रिंगणात उतरवले आहे. (BJP MP’s wife son join BJD)
जाणकारांच्या म्हणण्यानुसार देवगढच्या राणी आणि त्यांच्या पुत्राने बीजू जनता दलामध्ये प्रवेश करणे ही बाब वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते आहे. संबलपुर येथे आता धर्मेंद प्रधान यांचा सामना बीजदचे उमेदवार प्रणव प्रकाश दास यांच्याशी होणार आहे. दास यांना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय मानले जाते. ते तीन वेळा आमदार झाले आहेत तर एकदा त्यांना राज्यसभेवरही पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, बीजदमध्ये प्रवेश केल्यानंतर राणी अरूंधती देवी यांना किंव त्यांच्या पुत्राला देवगढ येथून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसे करून नवीन पटनायक यांची दोन उद्दिष्टे साध्य होतील. एक म्हणजे संबलपुरची लढत त्यांच्यासाठी तुलनेने सोपी हाईल आणि विधानसभेतही देवगढची जागा पक्षाला मिळण्याची संधी त्यामुळे त्यांनी साधली आहे. सध्या देवगढचे प्रतिनिधीत्व भारतीय जनता पार्टीचे सुभाष पाणीग्रही यांच्याकडे आहे. संबलपुर येथे २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.