भुवनेश्वर – ओडिशातील सत्तारुढ बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी आपल्या पक्षाचे आमदार प्रदीप पाणिग्रही यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लोकांच्या हिताविरोधी कारवया केल्याचा ठपका ठेवून गोपाळपूर येथील आमदार असलेल्या पाणिग्रही यांना तात्काळ पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
तीन वेळेला आमदार आणि माजी मंत्री असलेले पाणिग्रही लोकांच्या हिताविरोधात कारवाया केल्याच्या आरोपाखाली बिजू जनता पार्टीतून हकालपट्टी करण्यात आलेले पहिले नेते आहेत. यापूर्वी पक्षातून अनेक नेत्यांना काढून टाकण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावर “पक्षविरोधी कारवायां’चा आरोप ठेवला गेला होता.
पाणिग्रही यांनी लोकविरोधी काय कृत्ये केली, याचा उल्लेख पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये करण्यात आलेला नाही. पाणिग्रही यांचे आणि सेवेतून निलंबित करण्यात आलेले भारतीय वन सेवेतील अधिकारी अभयकांत पाठक आणि त्यांचे चिरंजीव आकाश कुमार पाठक यांचे संबंध असल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी दक्षता शाखेने केला आहे.
अभयकांत पाठक आणि आकाश कुमार पाठक यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. आकाश पाठक यांनी गंजम जिल्ह्यातील युवकांना नोकरीचे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे.