पुणे – खराडी येथील ‘खालसा जीम’ मध्ये असलेल्या जलतरण तलावात एका १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (Pune: Boy drowns in swimming pool at ‘Khalsa Gym’ in Kharadi)
अतीक तांबोळी (वय १३, रा. गणेशनगर, चंदननगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. प्रतीक हा मंगळवारी दुपारी खराडी येथे असलेल्या ‘खालसा जीम’मध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत होते. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी जीवरक्षक देखील जलतरण तलावावर उपस्थित होते.
पोहताना तो बुडायला लागला. मात्र, ही गोष्ट कोणाच्याही लवकर लक्षात आली नाही. त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी वारजे येथील एका आलीशान सोसायटीच्या जलतरण तलावात बुडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडल्याने जलतरण तलावांवरील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.