Asian Wrestling Championships 2024 : बिश्केक (किरगिझस्तान) रेल्वेकडून खेळणारी कुस्तीपटू अंजू आणि हर्षिता यांनी किरगिझस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या गटात रौप्य पदक जिंकले. या दोन्ही कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती आणि ते सुवर्णपदक मिळवून देतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही आणि दोन्ही कुस्तीपटूंना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अंजूने अंतिम सामना वगळता प्रत्येक फेरीत चांगली कामगिरी केली होती. तिने फिलीपिन्सच्या आलिया रोज गॅव्हेलेझ आणि श्रीलंकेच्या नेथमी अहिंसा फर्नांडो यांच्यावर तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला. उपांत्य फेरीत तिला चीनच्या चेन लेईकडून कडवी टक्कर मिळाली असली तरी हा सामना ९-६ असा जिंकण्यात तिला यश आले.
अंतिम फेरीत अंजूचा सामना उत्तर कोरियाच्या जी हयांग किमशी झाला, परंतु सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंतिम फेरीत अंजूला एकही गुण मिळवता आला नाही आणि तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारावर तिने सुवर्णपदकाचा सामना गमावला.
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
हर्षिताचा अंजूपेक्षा खडतर प्रवास होता आणि अंतिम फेरी गाठताना तीन गुण गमावले. हर्षिताने उझबेकिस्तानच्या ओझोडा झारीपबोएवाचा तांत्रिक श्रेष्ठतेने (१३-३) पराभव करण्यापूर्वी कझाकिस्तानच्या अनास्तासिया पानासोविचचा ५-० असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या कियान जियांगशी झाला. ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या लढतीत हर्षिताला तिच्या चिनी प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान पेलवले नाही आणि तिला २-५ ने पराभवाचा सामना करावा लागला.