सांगली – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. ज्यानंतर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटासाठी आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी सुटल्याचे स्पष्ट झाले. पण सांगलीच्या जागेवरील मविआतील तिढा काही सुटला नाही.
कारण ही जागा ठाकरे गटासाठी जरी सुटलेली असली तरी सांगलीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी या जागेवर आपला दावा केला. परंतु, पक्षाकडून याबाबत कोणतेही उत्तर न आल्याने आज सोमवारी (ता. 15 एप्रिल) त्यांनी सांगली लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सांगली लोकसभेतून मविआकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रहार पाटील यांनी अद्यापही उमेदवारी अर्ज भरलेला नसला तरी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर उद्या मंगळवारी ते आपला अर्ज भरणार आहेत, अशी माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे.
सांगली लोकसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 19 एप्रिल आहे. पण त्याआधीच विशाल पाटलांनी बंडखोरी करत मविआची डोकेदुखी वाढवली आहे. मात्र, याबाबत आता 22 एप्रिलआधी काँग्रेसच्या नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
विलास जगताप यांची भाजपला सोडचिठ्ठी
जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांचा प्रचार ताकदीने करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोमवारी जाहीर केला.
पक्षाने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देउ नये असे जाहीर मत व्यक्त केले होते. मात्र, त्यांना पक्षाने विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर करत जत तालुक्यात जगताप यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना ताकद देत त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले.