बंगळुरू : लोकसभा निवडणुकीमुळे कर्नाटकमधील सत्तारूढ कॉंग्रेसची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातून त्या पक्षाने सहा मंत्र्यांच्या पुढील पिढीतील सदस्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कर्नाटकात कॉंग्रेसची भिस्त प्रस्थापितांच्या वारसदारांवर, नातलगांवर असल्याचे दिसते.
कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. मागील वेळी (वर्ष २०१९) त्यातील केवळ १ जागा कॉंग्रेसला जिंकता आली. त्या नामुष्कीचा शिक्का पुसून यावेळी २० जागा जिंकण्याचा चमत्कार घडवण्याचा निर्धार कॉंग्रेसने केला आहे.
मोठे लक्ष्य निर्धारित केल्याने राज्यातील काही मंत्र्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी पक्षाने प्रयत्न केले. मात्र, संबंधित मंत्र्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावावर असहमती दर्शवली. त्यांनी कुटूंबांतील सदस्यांचा पर्याय पुढे केला. पक्षाने तो स्वीकारत मंत्री आणि नेत्यांवर नातलगांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली आहे.
कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये ३ मंत्रिपुत्रांना आणि ३ मंत्रिकन्यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय, एका मंत्र्याची पत्नीही उमेदवार बनून राजकीय नशीब आजमावत आहे. उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांचे बंधू डी.के.सुरेश पुन्हा रिंगणात उतरले आहेत.
मागील वेळी विजय मिळवणारे ते कॉंग्रेसचे एकमेव उमेदवार होते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण डोड्डामणी यांनाही यावेळी मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या प्रचाराची धुरा खर्गे यांचे मंत्रिपुत्र प्रियांक यांच्या खांद्यावर आहे.