Bajrang Punia – पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरल्यानंतरही भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक यांचा करार वाढवण्याची त्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.
बजरंग पुनियाचे प्रशिक्षक काझी मुस्तफा यांच्यासोबतचा करार २४ मे २०२४ पर्यंत वाढवण्याला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, बजरंग पुनिया याने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेविरोधात आंदोलनही केले.
त्यानंतर काही दिवसांपूर्वीच झालेल्या आशियाई व ऑलिंपिक पात्रता फेरीत तो ६५ किलो वजनी गटात अंतिम चार फेरीपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करण्याच्या त्याच्या आशा संपूष्टात आल्या होत्या. पुनियासह टेबल टेनिस खेळाडू श्रीजा अकुला, मानस ठक्कर, पयास जैन, ज्युडो खेळाडू तुलिका मान यांच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत.