सांगली – गेल्या आठवड्यातील विक्रमी दराचा उच्चांक मोडत मंगळवारी सांगली बाजारात हळद दराने पुन्हा क्विंटलला ७० हजारांचा टप्पा गाठला असून सोन्यापेक्षा अधिक दर हळदीला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात हळद दराने ६१ हजारांचा विक्रम नोंदवला होता.
सांगली बाजार समितीमध्ये मंगळवारी काढण्यात आलेल्या हळद सौद्यामध्ये संगमेश्वर ट्रेडर्स या बाजार समिती संचालक काडाप्पा वारद यांच्या अडत दुकानामध्ये हळदीला प्रति क्विंटल ७० हजारांचा दर मिळाला.
मल्लिकार्जुन तेली (रा. हदीगुंद, ता. रायबाग, जि. बेळगाव) या शेतकर्याने विक्रीसाठी आणलेल्या राजापुरी हळदीला हा सर्वोच्च दर मिळाला. शेतकर्याचे ११ पोत्यांचे एक कलम होते. या हळदीची सर्वोच्च बोली खरेदीदार श्रीकृष्ण कार्पोरेशन या पेढीकडून लावण्यात आली.