नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीच्या नावाने नोंदणीकृत असलेली फॉर्च्युनर ही कार चोरीला गेल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार ही कार दक्षिण दिल्लीतून चोरीला गेली आहे. ही घटना 19 मार्च 2024 ची आहे. आजपर्यंत या कारचा शोध लागला नाही. (bjp president jp nadda wife fortuner car stolen)
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांच्या पत्नीच्या कारचा चालक जोगिंदर याने गोविंदपुरी येथील एका सर्व्हिस सेंटरमध्ये फॉर्च्युनर सोडली होती आणि काही वेळासाठी ते घरी गेले होते, परंतु जेव्हा ते परत आले तेव्हा कार तेथे नव्हती. यानंतर लगेच एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज तपासणाऱ्या पोलिस पथकाला ही कार शेवटच्या वेळी गुरुग्रामकडे जाताना दिसली. पोलिसांनी खूप प्रयत्न केले, मात्र अद्यापपर्यंत गाडीचा काहीही पत्ता लागलेला नाही.
विशेष म्हणजे ही फॉर्च्युनर कार हिमाचल प्रदेशमध्ये जेपी नड्डा यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून चोरट्यांना लवकरात लवकर अटक करु असे आश्वासन दिले आहे.
राजधानी दिल्लीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका अहवालानुसार दर 14 मिनिटांनी एक वाहन चोरी होते. अहवालानुसार 2022 ते 2023 दरम्यान भारतात वाहन चोरीचे प्रमाण सुमारे 2.5 पटीने वाढले आहे.