पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभा मतदार संघातील भोसरी विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. भोसरीतील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निवडणूक – लोकशाहीचा उत्सव या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये मतदानविषयक जनजागृती करण्यात आली. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम भोसरी विधानसभा २०७ मार्फत घेण्यात आला.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार सतिश थेटे, शिक्षणाधिकारी संगीता घोडेकर बांगर, नायब तहसीलदार अपर्णा देशपांडे, सहा प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालयात ‘निवडणूक – लोकशाहीचा उत्सव’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी उपस्थित पालकवर्गास व मतदारांस सहाय्यक नोडल अधिकारी अमोल फुंदे यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे महत्त्व पटवून दिले. विनायक भुजबळ यांनी मतदार प्रतिज्ञा घेऊन आशय समजावून सांगितला.