छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील संघर्ष मिटल्याचे समजते. हे दोन्ही नेते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. अशात उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी खैरे-दानवे यांची एकत्रित बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दरम्यान, त्यांनी खैरे आणि दानवे यांची एकत्रित बंद दाराआड चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमधील वादावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
तर, ठाकरेंकडून दोन्ही नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, उमेदवारी कुणालाही मिळाली तरी त्याला निवडूण आणले पाहिजे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्याचे कळत आहे. मात्र, या बैठकीनंतर देखील दोन्ही नेत्यांमधील वादाला पूर्णविराम मिळाला असल्याचे चित्र दिसून येत नाही. तर, अशी बैठक झाली नसल्याचे दानवे म्हणाले.