Lok Sabha Election 2024 – भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी दोन याद्या आतापर्यंत जारी केल्या आहेत. उत्तर प्रदेशबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत या पक्षाने ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आता लवकरच तिसरी यादी जाहीर केली जाणार असून त्यात अनेक विद्यमान खासदारांना वगळले जाणार असून जी नावे चर्चेत आहेत अशा नावांना संधी दिली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला राहीलेल्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून भाजप नुपूर शर्मा यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तर मेरठ मतदारसंघातून प्रख्यात कवी कुमार विश्वास यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. । Lok Sabha Election 2024
नुपूर शर्मा या पूर्वी भाजपच्या प्रवक्त्याही राहील्या आहेत तर कुमार विश्वास यांची देशभरात ओळख आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष वादग्रस्त ब्रिजभूषण सिंह यांना यंदा कैसरगंज येथून उमेदवारी नाकारली जाण्याची चर्चा आहे.
त्यांचे नाव पहिल्या यादीतही नव्हते. ५१ उमेदवार जाहीर झाल्यावरही ब्रिजभूषण यांचे नाव नसल्यामुळे पक्षाने त्यांचा पत्ता कट केल्याचे मानले जाते आहे. त्यांच्यासोबतच भाजपच्या यादीत मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरूण गांधी यांच्या नावांचाही अद्याप समावेश झालेला नाही. त्यामुळे या बड्या नेत्यांना वेगळा पर्याय शोधावा लागण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार मेरठमधून कुमार विश्वास यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहेच. मात्र जर काही बदल झालाच तर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रामाची भूमिका निभावणारे अरूण गोविल यांनाही भाजप तेथून रिंगणात उतरवू शकते. सगळ्यांत मोठे नाव नुपूर शर्मा यांचे असणार आहे व त्याचे कारण रायबरेली.
राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव झाल्यावर गांधी कुटुंबाने उत्तर प्रदेशातून आपले मन काढून घेतले आहे असे सूचित होते आहे. त्याचे कारण पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी याही आता रायबरेली ऐवजी राजस्थानातून राज्यसभेवर दाखल झाल्या आहेत.
प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा बऱ्याच काळापासून आहेत. मात्र त्याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळाला नाही. मात्र भाजपने येथून नुपूर शर्मा यांचे नाव फायनल केले असल्याचे समजते.
प्रेषित पैंगबर यांच्या संदर्भात वादग्रस्त टिप्पणी करून नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी झाली होती व सार्वजनिक ठिकाणही ते गेल्या काही काळात फारशा दिसल्या नाहीत.
त्यावेळी त्यांच्या विधानामुळे देशातच नव्हे तर देशाबाहेरही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शर्मा यांना ठार मारण्याची धमकी मिळाली होती. आता जर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने प्रियंका यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तर कॉंग्रेससाठी ते मोठे धाडसाचे ठरेल अशीही चर्चा आहे. । Lok Sabha Election 2024