टोकियो : पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या विविध देशांमध्ये सतत कोठे ना कोठे विचित्र अशा नैसर्गिक घटना घडत असतात. अनेक वेळा अशा घटना समोर येत असल्या तरी काही लपवण्याचाही प्रयत्न केला जातो. जपानमध्ये 1943 मध्ये एका गव्हाच्या शेतात अचानक निर्माण झालेला पर्वत अशीच एक विचित्र नैसर्गिक घटना होती. पण जपानने ही घटना दीर्घ काळ लपवण्याचा प्रयत्न केला होता. जपानच्या होकायेडू प्रांतामध्ये शिकतो नॅशनल पार्क मध्ये आजही हा पर्वत पाहायला मिळतो. शोवा शिंजान नावाने हा पर्वत ओळखला जातो.
28 डिसेंबर 1943 रोजी अचानक गव्हाच्या एका शेतामध्ये हा पर्वत निर्माण झाला. तो हळूहळू वाढत होता, हा ज्वालामुखीचा पर्वत होता आणि तो किमान 400 मीटर उंच होता. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये ही घटना घडल्याने जपानच्या अधिकाऱ्यांनी ही नैसर्गिक घटना लपवण्याचा प्रयत्न केला कारण यामध्ये कोणती अंधश्रद्धा पसरू नये असा त्यांचा हेतू होता. पण कालांतराने या शेतामध्ये असा पर्वत अचानक निर्माण झाल्याची माहिती सर्वत्र पसरली आणि जगाला या नैसर्गिक घटनेची कल्पना आली.
मसाओ मीमासू नावाच्या एका शिक्षकाने या पर्वताचा अभ्यास केला आणि 1948 मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्याचे सादरीकरण केले. या शिक्षकाने केवळ संशोधनासाठी हा पर्वत आणि तेथील जमीन खरेदी केली आणि संशोधन पूर्ण केले. गव्हाच्या शेतात हा पर्वत निर्माण होण्याचे कारण काय याचा अभ्यास त्याने आपल्या अहवालात सादर केला. नंतरच्या काळात जपानने या परिसराचे वर्णन नैसर्गिक चमत्कार असे केले आणि त्या ठिकाणी या शिक्षकाचा पुतळा सुद्धा प्रस्थापित केला. आजही जगभरातील अनेक पर्यटकांसाठी हा पर्वत हे एक आकर्षणाचे केंद्र झाले आहे.