TCS shares fall – टीसीएस मधील आपले काही भाग भांडवल टाटा सन्स ही प्रवर्तक कंपनी खुल्या बाजारात विकणार असल्याचे वृत्त आज वृत्त माध्यमातून आल्यानंतर टीसीएस कंपनीच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे या कंपनीचा शेअर एकाच दिवसात दोन टक्क्यांनी कमी झाला असल्याचे दिसून आले.
टीसीएसची प्रवर्तक कंपनी असलेली टाटा सन्स 2.3 कोटी शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. एकूण शेअरच्या हे प्रमाण 0.64% इतके आहे. यासाठी 4,001 रुपये प्रति शेअर किंमत मोजली जाणार आहे. जी सोमवारच्या बाजारभावापेक्षा 3.45 टक्क्यांनी कमी होते. या कारणामुळे आज मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री झाली आणि शेअरचा भाव कमी झाला.
डिसेंबर 2023 च्या आकडेवारीनुसार टाटा सन्सकडे टीसीएसचे 72.38 टक्के इतके भाग भांडवल आहे. काही माध्यमानी टाटा सन्सची शेअर बाजारावर सप्टेंबर 2025 च्या दरम्यान नोंदणी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात चढउतार होत असल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँकेने एनबीएफसीना शेअर बाजारावर नोंदणी करण्यास सांगितले आहे. यासाठीची कालमर्यादा आखून दिली आहे. त्या अगोदर टाटा सन्सची शेअर बाजारावर नोंदणी होण्याची शक्यता माध्यमातून व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. टीसीएस कंपनीचे बाजार मुल्ये पंधरा लाख कोटी रुपयांचे आहे. तर टाटा सन्समध्ये एकूण 29 कंपन्या आहेत. या 29 कंपन्यांचे बाजार मूल्य 31.6 लाख कोटी रुपयांचे समजले जाते.