नवी दिल्ली – दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात तुरूंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने त्यांच्या जामीनाला विरोध केला आहे.
या प्रकरणात आणखी काही हाय प्रोफाइल लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. सिसोदिया यांना जामीन मिळाला तर पुरावे नष्ट करू शकतात असा दावा करत सीबीआयने विरोध केला आहे.
दरम्यान, तपासात विलंब केला जातो आहे अशी बाजू सिसोदिया यांच्या वकिलाने मांडली. त्यावर जर कारवाई संथ गतीने सुरू असेल तर आरोपी तीन महिन्यांनंतर जामीनासाठी न्यायालयात येऊ शकतो असे न्यायालयाने त्यांना सांगितले.
सिसोदिया यांचा नियमित जामीनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर सिसोदिया यांच्याकडून क्युरेटिव्ह पीटीशन दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
मद्य घोटाळ्याचा तपास सीबीआय करत असून या घोटाळ्यातील मनी लॉंडरिंगचा तपास ईडी करते आहे. दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांना अटक करण्यात आली होती.
जैन यांचीही याचिका फेटाळली
आम आदमी पक्षाचे अन्य नेते सत्येंद्र जैन यांच्या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. त्यांनीही मनी लॉंडरिंग प्रकरणात जामीन अर्ज केला होता. त्यांची याचिका फेटाळताना त्यांना आजच सरेंडर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जैन यांची फिजिओथेरपी सुरू असून शरणांगती पत्करण्यासाठी मुदत मिळावी अशी मागणी त्यांच्या वकिलाने केली होती.