पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उमेदवाराचे नाव जाहीर होताच पुणे भाजपचे कंबर कसली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांना सोमवारपासून सुरूवात होणार आहे. याशिवाय पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघांतही बैठका घेतल्या जाणार आहेत. या बैठकांना महायुतीतील पक्षांचे सर्व प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
पुणे, बारामती, शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रमुख म्हणून चंद्रकांत पाटील हे बैठका घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आजी-माजी लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार असून, त्यामध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे, रिपाइंचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, शैलेश चव्हाण, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संजय आल्हाट,
रिपाइं (खरात गटाचे) सचिन खरात, शिवसंग्रामचे अध्यक्ष भरत लगड, लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे यांसह रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना, स्वाभिमान संघटना, भीमसेना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, लहुजी सेना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, पीपल्स रिपब्लिक पार्टी (जोगेंद्र कवाडे गट) यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवाय, पुणे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदार संघनिहाय या बैठका वेगवेगळ्या वेळी होणार आहेत. त्यामध्ये कॅन्टोन्मेंटसह सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या बैठकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची रणनिती ठरवण्यात येणार आहे. तसेच त्यादृष्टीने नियोजनही करण्यात येणार आहे.