बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेच्या अधिनस्त १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी), येथे स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
सोमेश्वर नगर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरील ऊसतोड कामगारांना देखील आरोग्य विषयक फायदा होईल.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमेश्वरनगर येथे १०० खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्यात येणार आहे.
या आरोग्य पथकाकरीता उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामाकरीता एकूण रू.७७ कोटी ७९ लाख इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इमारतीमध्ये दिव्यांगाकरीता विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत, पदनिर्मिती, यंत्रसामुग्री व साधनसामुग्री इत्यादी बाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.