वारजे, {प्रभात वृत्तसेवा} – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उड्डाणपुलासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली वारजे येथील आंबेडकर चौकात हे आंदोलन झाले.
ज्याठिकाणी सर्वाधिक कोंडी होते, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्याठिकाणी निधीची तरतूद करून उड्डाणपूल उभारण्यात यावा यासाठी सुप्रिया सुळे यांच्या मार्फत माजी नगरसेवकांकडून वारंवार महापालिका आयुक्तांकडे मागणी केली जात होती. त्यानुसार आंबेडकर चौकातील परिस्थितीचे गांभीर्य आणि नागरिकांना होणार मनस्ताप लक्षात घेऊन महापालिकेच्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पात उड्डाणपुलासाठी निधीची तरतूद होईल, असे वाटत होते. मात्र, प्रशासकाकडून शून्य तरतूद केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी प्रशासनाविरोधात एकत्र आवाज उठवत आंदोलन केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रशांत जगताप, माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेविका सायली वांजळे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, कार्याध्यक्ष सुरेश गुजर, कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने, शुक्राचार्य वांजळे, शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, ठाकरे गटाचे जगदीश दिघे, नितीन वाघ, शाम मोरे यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचे नियोजन माजी नगरसेवक सचिन दोडके आणि कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी केले.