Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या त्याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. लवकरच सगळी स्थिती स्पष्ट होईल अशी माहिती संयुक्त जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लोकसभेच्या ४० जागांपैकी जनता दल १६ तर भारतीय जनता पार्टी १७ जागा लढवणार आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती (पासवान) पक्षाला चार जागा देण्याबाबत सहमती झाली आहे. उर्वरित तीन जागा हम, रालोसपा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षांना दिल्या जाणार आहेत.
एनडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त जनता दलाने झारखंडमध्येही एका जागेची मागणी केली आहे. नितीश कुमार यांच्या बिहारमधील एका निकटवर्तीय नेत्याला झारखंडमधून रिंगणात उतरवण्याचा नितीश यांचा इरादा आहे.
जर झारखंडची एक जागा नितीश यांना सोडली तर मात्र बिहारमधील एक जागा नितीश यांना सोडावी लागेल. अर्थात ते आपल्या राज्यात केवळ १५ जागा लढवू शकतील.
काही जागांची अदलाबदलीही केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यावर आज रात्रीत बोलणी पूर्ण होणार असून उद्या म्हणजे शुक्रवारी घोषणा केली जाणार आहे.