शिक्रापूर,(वार्ताहर)- जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या कडेला एकाचा संशयित मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या मृतदेहाबाबत तर्क- वितर्क लढविले जात आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहावर जखमा असल्याने घातपाताची शक्यता बळावली आहे.
जातेगाव खुर्द येथील चासकमानच्या कडेला एका शेतात एकाचा संशयित मृतदेह तसेच मृतदेहाच्या तोंडातून रक्त आल्याचे तसेच डोक्याला व पायाला जखमा असल्याचे एका शेतकऱ्याला दिसून आले. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंके, केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे,
पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक रोहिदास पारखे, विकास पाटील जयराज देवकर, निरज पिसाळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, हवालदार जनार्दन शेळके, तुषार पंदारे, पोलीस पाटील कृष्णा गाजरे आदींनी घटनास्थळी पाहणी केली. आजूबाजूला तपासणी केली मात्र काहीही माहिती मिळू शकली नाही.
मात्र, युवकाचे अंदाजे ३० ते ३५ वर्षे वय, उंची पाच फुट, अंगात लाल रंगाचा हाफ शर्ट व राखाटी रंगाची पॅट, उभट चेहरा, काळे केस, रंगाने सावळा असा आहे. त्याच्या तोंडातून रक्त आलेले तसेच डोक्याला व पायाला जखमा असल्याचे दिसून आल्याने त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिला. याबाबत जातेगाव खुर्दचे पोलीस पाटील कृष्णा भिकाजी गाजरे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.