लंडन – ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांच्या समस्या सोडवण्यासाठी तेथील विरोधी मजूर पक्षाने लेबर इंडिया नावाचा एक गट स्थापन केला आहे. दोन्ही देशांमध्ये यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे या गटाच्या स्थापनेला राजकीय महत्व देखील आहे.
मजूर पक्षाच्या शॅडो कॅबिनेटमधील परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी संसदेच्या प्रांगणात या गटाची स्थापना केली. अलिकडेच त्यांनी भारताला भेट दिली होती आणि ब्रिटनमध्ये स्थायिक भारतीयांच्या समस्या सोडवण्यासाठी असा गट स्थापन करणे ही त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यानुसार या गटाची स्थापना करण्यात आली आहे.
भारत एक महासत्ता आहे, असे सांगून लॅमी यांनी हे संबंध पक्षीय राजकीय भेदापलिकडे आहेत, यावर जोर दिला. लॅमी यांनी भारतासोबत मुक्त व्यापार कराराचे काम पूर्ण करण्यासाठी पक्षाला वचनबद्ध केले आहे,
हा करार जानेवारी २०२२ मध्ये कंझर्व्हेटिव्ह सरकारने सुरू केलेल्या वाटाघाटीच्या चौदाव्या फेरीत आहे आणि आता दोन्ही बाजूंना सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम मुदत जवळ आली आहे. तरी हा करार अजून अंतिम टप्प्यात आला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.