रांजणगाव गणपती, (वार्ताहर) – संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच दर्शन रांगेतील भाविकांच्या हस्ते सकाळची व सायंकाळची आरती करण्यात येत असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिली. संकष्टी चतुर्थीनिमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.
तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच भावेश कामदार या भाविकाकडून ५ कॅरेट केळींचा महाप्रसाद देण्यात आला. श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.