हिंजवडी, (वार्ताहर) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथे शनिवारी (दि. 24) सायंकाळी चार वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे व कार्याध्यक्ष आनंदा घोगरे यांनी दिली.
या सभेत उपमुख्यमंत्री पवार काय बोलतात, याकडे मुळशीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आलेली पक्षाची सूत्रे, होऊ घातलेली लोकसभा निवडणूक, तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात ते काय भूमिका घेणार याची उत्सुकता मुळशीतील नागरिकांना लागून राहिली आहे.
बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवार यांचा पकडलेला हात या मुद्द्यावर अजित पवार काही भाष्य करतात का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच आघाड्यांवर अनेक जणांना महत्त्वाची पदे दिलेली असून अजित पवार यांच्या विचाराच्या उमेदवाराला लोकसभेत आघाडी मिळाली पाहिजे यासाठी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी गेल्या तीन दिवसांपासून कामाला लागले आहेत. सभेच्या नियोजनासाठी बैठका व कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू आहे.
मुळशीत पहिल्यांदाच होणार्या या सभेत सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल ते काही बोलतात का? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वर्षांनंतर मुळशी तालुक्यात येत आहेत.