कर्जत, (प्रतिनिधी): कर्जत तालुका मराठा सेवा संघ अंतर्गत जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने नुकताच विधवांचा हळदी- कुंकवाचा व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम बाजारतळ येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्जत तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रूपचंद जगताप होते,
यावेळी मार्गदर्शक कालिदास शिंदे, उपाध्यक्ष अमित देशमुख, खजिनदार पांडुरंग धनवडे, विठ्ठल पिसाळ, पाटील सर, धनराजराजे भोसले, प्रफुल्ल वाघमारे, सुनील धस आदी उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेडच्या कर्जत तालुका अध्यक्ष उज्वला शेळके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिमा पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनिता सटाले-पावणे यांनी मार्गदर्शन केले. विधवा व एकल महिलांना हळदी-कुंकू, तिळगुळ, पानसुपारी, तसेच पीस हे वाण देण्यात आले.
रोहिणी यादव, सारिका परहर आदींनी मनोगत व्यक्त केली. जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी प्रमिला शेळके, स्मिता रसाळ, अनिता गांगर्डे, किरण जगताप आदी उपस्थित होत्या. कालानुरूप बदल स्वीकारा. पूर्वी तुम्ही अर्धांगिनी होता,आता तुम्ही पूर्णांगिनी झाला आहात,असे मत प्रमुख पाहुणे प्रा.सुनिता सटाले यांनी व्यक्त केले.