लखनौ -भाजपच्या हातून उत्तरप्रदेशचा विकास होणार नसल्याची जाणीव राज्यातील जनतेला झाली आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील जनतेने त्या पक्षाला नाकारल्याचे लोकसभा निवडणूक निकालातून स्पष्ट होते, अशी भूमिका समाजवादी पक्षाच्या (सप) खासदार डिंपल यादव यांनी बुधवारी मांडली. सप आणि कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने उत्तरप्रदेशात सर्वांनाच चकित करणारे यश मिळवले. त्याचा आधार घेऊन सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी असणाऱ्या डिंपल यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या केंद्रातील १० वर्षांच्या राजवटीत संपूर्ण उत्तरप्रदेशात कुठलेच विकासकार्य झाले नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे, असे त्या इटावामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक ८० जागा आहेत. त्यातील तब्बल ४३ जागा इंडिया आघाडीने जिंकल्या. सपने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना ३७ जागांवर विजय मिळवला. तर, कॉंग्रेसने ६ जागा हस्तगत केल्या. स्वत: डिंपल मैनपुरी मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा २ लाख २१ हजारपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.