मुंबई-लोकसभा निवडणुकीत राज्यातील पक्षांनी केलेल्या कामगिरीचा विचार करता राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शरद पवार गट सरस ठरला. त्या गटाच्या विजयाचा स्ट्राईक रेट तब्बल ८० टक्के इतका भरला. राज्यात सत्तारूढ महायुती आणि विरोधी बाकांवर असणाऱ्या महाविकास आघाडीत मुख्यत्वे लढत झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीने महायुतीला छोबीपछाड दिला.
राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी ३० जागा आघाडीने जिंकल्या. तर, महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. आघाडीचे घटक असणाऱ्या कॉंग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि शरद पवार गटाने अनुक्रमे १३, ९ आणि ८ जागा जिंकल्या. विजयाचा सर्वांधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या शरद पवार गटाने आघाडीत सर्वांत कमी म्हणजे १० जागा लढवल्या होत्या.
मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) राज्यात केवळ १ जागा मिळवू शकणारा कॉंग्रेस यावेळी सर्वांधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. यावेळी कॉंग्रेसने १७ जागा लढवल्या. त्या पक्षाच्या विजयाचा स्ट्राईक रेट ७५ टक्के इतका आहे. आघाडीत सर्वांधिक २१ जागा ठाकरे गटाने लढवल्या. त्या गटाच्या विजयाचा स्ट्राईक रेट ४१ टक्के इतका नोंदवला गेला.
महायुतीचा प्रमुख घटक असणाऱ्या भाजपने राज्यात सर्वांधिक २८ जागा लढवल्या. तो पक्ष केवळ ९ जागा जिंकू शकला. भाजपच्या विजयाचा स्ट्राईक रेट ३१ टक्के आहे. राज्यातील प्रमुख पक्षांचा विचार करता महायुतीमधील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वांत कमी म्हणजे २५ टक्के भरला.
त्या गटाला ४ पैकी केवळ १ जागा जिंकता आली. महायुतीमध्ये विजयाचा सर्वांधिक स्ट्राईक रेट (४५ टक्के) शिवसेनेच्या शिंदे गटाने गाठला. त्या गटाने लढवलेल्या १५ पैकी ७ जागांवर विजय मिळवला.