नवी दिल्ली- आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि आजची बैठक चांगली झाली अशी प्रतिक्रिया तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबु नायडू यांनी बैठक संपल्यानंतर बोलताना दिली. बैठकीत काय निर्णय घेण्यात आले याबाबत नंतर सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बैठक झाल्यानंतर नायडून तातडीने भारतीय जनता पार्टीचे नेते पीयूष गोयल यांच्या घरी रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोयल यांच्या घरी एनडीए सरकारमध्ये तेलगु देसम पक्षाला किती मंत्रिपदे दिली जातील आणि खाती कोणती असतील याबाबत चर्चा झाल्याचे समजते. अर्थात त्याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, आजच्या बैठकीत नायडू याना देण्यात आलेले विशेष महत्व लपून राहीले नाही. मोदी यांच्या शेजारच्या आसनावरच त्यांना बसवण्यात आले होते. त्यावेळी मोदी यांना पाठिंबा देण्याचे पत्रही त्यांनी सोपवले. पत्र देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठीच ते आले होते. जागा घटूनही शिंदेंची ताकद वाढली एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रात १५ जागांवर लढली व त्यातील ७ जागांवर त्यांना विजय मिळाला. १३ जागांवर त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी थेट सामना झाला. त्यातील सहा जागांवर शिंदेसेनेची सरशी झाली. ठाकरेंना मिळालेल्या जागा पाहता आणि फुटीच्या अगोदर जेवढे खासदार होते त्यांची संख्या पाहता शिंदे याची ताकद कमी झाली असे कोणी म्हणू शकतो. मात्र भारतीय जनता पार्टीलाच स्पष्ट जनादेश नसल्यामुळे एनडीएतला प्रत्येक घटक पक्ष त्यांच्यासाठी महत्वाचा आहे व त्या घटक पक्षाचा प्रत्येक खासदारही महत्वाचा ठरला आहे. त्यामुळे एकप्रकार नायडू, नितीश यांच्यानंतर अधिक जागा असणाऱ्या शिंदे यांची ताकद वाढलीच आहे. केंद्रातील नव्या सरकारमध्ये त्यांना किती मंत्रिपदे अथवा अन्य काय मिळेल हा नंतरचा भाग. तथापि, शिंदेंच्या शब्दाला जे अगोदरच्या सरकारमध्ये नव्हते त्यापेक्षा जास्त वजन आता नक्कीच असेल.