लोणी काळभोर –येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणार्या टोळीचा म्होरक्या ऋषिकेश पवार व त्याचे इतर 3 साथीदारांवर पुणे शहर पोलिस आयुक्तांनी ’मोक्का’ची कारवाई केली आहे.
ऋषिकेश सुरेश पवार (वय 26, रा, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर), गौरव चंद्रकांत सोनवणे (वय 21), सागर गणपत पवार (वय 26, दोघे रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर अनिकेत गुलाब यादव (वय 21, रा. पठारेवस्ती लोणी काळभोर) हा आरोपी सध्या फरार आहे.
टोळीप्रमुख हृषिकेश पवार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मागील 10 वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, मृत्यू किंवा जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, बेकायदा जमाव जमवून गुन्हेगारी कृत्य सातत्याने सुरू ठेवली होती. टोळीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती; मात्र, त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काहीही फरक पडला नाही.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त आर राजा यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. या अर्जाची छाननी करून अप्पर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, अमोल घोडके, अंमलदार तेज भोसले, संदीप धनवटे, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.