नगर – श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे कोयत्याने वार करून एकाची हत्या करण्यात आली होती. याबाबत पत्नीच्या फिर्यादीवरून अद्न्यात व्यक्तीविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करत प्रियकराच्या मदतीनेच पत्नीनेच पतीचा काटा काढला असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे फिर्यादी पत्नीसह सहा संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
आरती योगेश शेळके (वय २६), रोहीत साहेबराव लाटे (वय २३, दोन्ही रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा), शोएब महमंद बादशाह, रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई), विराज सतिष गाडे, (रा. सोलापुर बाजार, कॅम्प पुणे), आयुष शंभु सिंह, पृथ्वीराज अनिल साळवे, अनिश सुरेंद्र धडे (तिन्ही रा. घोरपडे पेठ, पुणे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे.
योगेश सुभाष शेळके या युवकाची हत्या दि.30 जानेवारी रोजी धारदार कोयत्याने हत्या करण्यात आली होती. याबाबत मयताची पत्नी आरती योगेश शेळके यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या बाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पहाणी करुन आजु बाजूला विचारपुस केली असता घटनाक्रम पहाता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता. परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याचे सोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले. फिर्यादी पत्नी आरती हिनेपण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगत पथकाची दिशाभुल केली. मात्र, गुन्हे शोध पथकाला या बाबत खात्री पटत नसल्याने पथकाने पुन्हा दोन दिवस कोथुळ गावात तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषणा दरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहीत साहेबराव लाटे (वय २३, रा. कोथुळ, हल्ली मुक्काम पुणे) याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आल्याचे दिसुन आले. त्या नंतर पथकाने पुणे येथून रोहीत लाटे याला ताब्यात घेतले. व विचारले असता मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
ही कारवाईनमुद गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस कर्मचारी बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, रवींद्र घुगांसे, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, आकाश काळे, भाग्यश्री भिटे, सोनाली साठे, ज्योती शिंदे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांच्या पथकाने केली.
.
१५ दिवसापूर्वी शिजला हत्येचा कट
मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन पत्नी आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागिल १५ दिवसापुर्वी हत्येचा कट रचून अनिश सुरेंद्र धडे (रा. पुणे) याचे मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे, विराज सतिष गाडे, शोएब महमंद बादशाह, आयुष शंभु सिंह यांना दिड लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यांचे मदतीने दोन दुचाकीवर त्यांचेसह येवुन खुन केल्याचे सांगितले.
खुनासाठी सोशल मिडीयाचा वापर
रोहीत व आरती यांचेतील संबंधाची कोणाला माहिती मिळु नये, म्हणुन स्नॅपचॅट या सोशल मिडीया ऍ़पचा वापर करुन ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते.