खडकवासला : पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलीस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत.
नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे अतिरिक्त नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. तर चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिका-यांच्या बदल्या होणार होत्या. आज शासनाने अध्यादेश जारी करत या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले.