नवी दिल्ली- उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या देखरेखीखाली पाणबुडीतून मारा करू शकणार्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी रविवारी घेण्यात आली. अण्वस्त्रे वाहून नेणार्या पाणबुडीच्या चाचणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ही चाचणी घेतली गेली होती.
नवीन पुलहवासल-३-३१ या क्रूझ क्षेपणास्त्राने पूर्वेकडील समुद्रावर ७,४२१ सेकंदांनी आणि पाणबुडीवरून मारा केल्यानंतर ७,४४५ सेकंदानी पूर्वनिश्चित लक्ष्यांवर अचूक मारा केला. या चाचणीमध्ये दोन क्षेपणास्त्रांचा समावेश होता. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने या चाचणीबाबतची माहिती दिली.
या क्षेपणास्त्रासाठीचे लक्ष्य किती अंतरावर होते, याचा तपशील देण्यात आलेला नाही. पूर्वेकडील शिंपो बंदराजवळ सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उत्तरकोरियाने डागलेली काही क्षेपणास्त्रे आढळली असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने रविवारी सांगितले. या बंदराजवळच उत्तर कोरियाच्या पाणबुड्यांची बांधणी करण्यासाठीचे शीपयार्ड आहे.
पुलवासल-३-३१ या नवीन क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाने बुधवारी प्रथमच घेतली. पहिल्या प्रक्षेपणानंतर अवघ्या चार दिवसांनी हे क्षेपणास्त्र पाणबुडीवरून देखील सोडले असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. .