वाघोली : डेन्मार्कमध्ये मॅनेजर पदावर नोकरी मिळवून देतो, असे सांगून वाघोली येथील ५५ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार व्यक्तीस अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. डेन्मार्क येथील सीजी जेन्ससन या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मॅनेजरपद रिक्त असल्याचे सांगितले.
तुम्ही तेथे काम करण्यास इच्छुक आहात का, अशी तक्रारदार यांना विचारणा केली. संमती कळवल्याने संबंधिताने रजिस्ट्रेशन फी, कन्सल्टेशन फी, व्हिजासाठी लागणारी फी अशी वेगवेगळी कारणे देत पैशांचा तगादा लावला. त्यानंतर तक्रारदार यांची मुलाखत घेऊन बनावट जॉब ऑफर लेटर दिले.
मात्र कोणताही जॉब न मिळाल्याने विचारणा केली असता आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. एकूण २८ लाख ६९ हजार रुपये भरले तरीसुद्धा नोकरी न मिळाल्याने तक्रारदार यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.