पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी, २०२४ (सोमवार) असा होता.
तथापि, राज्य शासनाने १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या दि.२३ जानेवारी, २०२४ (मंगळवार) रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचुक करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने नविन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्यांमध्ये बदल आदी कामे करून नोव्हेंबर महिन्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 80 लाख 73 हजार 183 झाली आहे. जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यानुसार जिल्ह्यात सर्वात मोठा मतदारसंघ हा चिंचवड असून या मतदारसंघात 5 लाख 85 हजार 731 मतदार अहेत. तर सर्वात लहान मतदारसंघ हा पुणे कॅन्टोन्मेट असून या मतदारसंघात 2 लाख 70 हजार 974 मतदार आहेत.
हडपसर सर्वात मोठा मतदारसंघ
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून शहरात सर्वांत मोठा मतदारसंघ हा हडपसर असून या मतदारसंघात 5 लाख 51 हजार 156 मतदार आहेत. आता अंतिम मतदार यादीत नव्याने नाव नोंदविलेल्या मतदारांची नावे समाविष्ट होणार आहे. ही अंतिम मतदार यादी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे, त्यामुळे या मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.