नवी दिल्ली – गाजामध्ये हमासने मोठ्या प्रमाणात बोगदे आणु भुयारांचे नेटवर्क उभारले असल्याचे संयुक्त राष्ट्राला माहिती नव्हते, असा धक्कादायक दावा संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने केला. मात्र त्या मुद्यावर तातडीने एक स्पष्टिकरणही दिले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एन्टनिओ गुटरेस यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.
गाझामधील अनेक शहरांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या एजन्सी अनेक वर्षांपासून कार्यरत असताना या बोगद्यांबद्दल काहीच माहिती नव्हते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी सावरासावर केली आहे. नाही, माहिती नव्हते, हेच खरे उत्तर आहे, असे ते म्हणाले. हे सगळे बोगदे अत्यंत गुप्तपणे बांधण्यात आले असावेत, असे ते म्हणाले.
मात्र या प्रवक्त्याच्या या उत्तराला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलार्ड एर्डन यांनी दोन पत्रांचा दाखला दिला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणी ऍन्टनिओ गुटरेस यांना आपण स्वतः दोन पत्रे लिहीली होती. या पत्रांमध्ये गाझामधील या बोगद्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. हे बोगदे संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीच्या ठिकाणांच्या अगदी जवळ असल्याने धोकादायक असल्याचेही आपण या पत्रातून गुटरेस यांना कळवले होते, असे एर्डन यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या रिलीफ ऍन्ड वर्क्स एजन्सीनेही २०२२ मध्ये या बोगद्यांची दखल घेतली होती. गाझातील शाळांच्या खाली अशाप्रकारे धोकादायक बोगदे खणण्यात आल्यावर या एजन्सीनेही जोरदार टीका केली होती. असे बोगदे खणणे निसर्ग आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनाही अनुसरून नाही, असे या एजन्सीने म्हटल्याचा दाखलाही एर्डन यांनी दिला आहे.
याशिवाय एर्डन यांनी संयुक्त राष्ट्राच्या याच एजन्सीचे कमिशनर जनरल फिलीप लॅझेरिनी यांना २०२१ मध्ये कळवल्याचाही दाखला दिला आहे. तरीही दुजोरिक यांंनी या बोगद्यांबद्दल संयुक्त राष्ट्राला काहीच माहिती नव्हते, असा धक्कादायक दावा केला. मात्र नंतर सावरासावर करताना हे बोगदे कधी बांधले गेले याची आपल्याला माहिती नव्हती, असे आपल्याला म्हणायचे होते, असे ते म्हणाले.