पुणे – जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना आरोग्य सेवा परिमंडळचे सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, नोडल अधिकारी डॉ. राहुल पिंपळकर, जिल्हा सल्लागार डॉ. जयश्री सारस्वत, समिती सदस्य उपस्थित होते.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात नोव्हेंबरअखेर ४९ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून ८ हजार २१९ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २८ तंबाखू नियंत्रण कक्षांमार्फत ४ हजार ४९९ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने ४६३ नागरिकांवर कारवाई करुन ५ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून ४०४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ७ नागरिकांवर कारवाई करुन ७०० रुपये दंडांची रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.