सहकारनगर – ट्रेजर पार्क जवळील रस्ता सुस्थितीत असताना तो खोदून त्या ठिकाणी पुन्हा नवीन कॉंक्रीटचा रस्ता करण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर डांबरी रस्ता अतिशय चांगल्या दर्जाचा व खड्डे विरहित असताना तो कॉक्रीटचा करण्याची मागणी कोणीह केलेली नाही.
केवळ, निधी खर्च करण्यासाठीच हा डांबरी रस्ता पालिका प्रशासनाकडून खोदण्यात आल्याचा अरोप नागरिकांनी केला आहे. शहरात असे प्रकर अनेक ठिकाणी होत आहे. चांगले रस्ते उघडून केवळ निधी खर्च करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून उठाठेव सुरू आहे.
महापालिकेकडून विनाकारण रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरात छोटे-मोठ्या खड्ड्ये असलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याएवजी चांगला डांबरी रस्ता खोदून नवीन रस्ता करण्याची गरजच काय? असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
विशेष म्हणजे सदर रस्ता सुस्थित असल्याचे मनपा अधिकारीही मान्य करीत आहेत. मात्र, पुढील २५ वर्षांचा विचार करता सदर पूर्ण रस्त्याचे काम एकत्र करणे गरजेचे असल्याने तो खोदावा लागल्याचे सांगितले जात आहे.
“ट्रेजर पार्क ते मित्र मंडळ चौक रस्ता कॉक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून सदर रस्त्याचे काम करण्यात येत आहे. रस्त्याच्या काही भागात असलेली अतिक्रमण काढण्यास सांगण्यात आले आहे.” – अमर शिंदे , कार्यकारी अभियंता, पथ विभाग मनपा
“सदर डांबरी रस्ता अतिशय चांगल्या स्थितीत होता पुढील अनेक वर्षे येथे दुरूस्तीची ही गरज नसताना कॉक्रीटचा रस्ता करण्याचा हट्ट महापालिका प्रशासनाकडून होत आहे. यावर निधी खर्च करणे म्हणजे कररूपी पैशाची उधळपट्टीच आहे.” – संदीप मोहिते-पाटील, सामाजिक कार्यकर्ता
“ट्रेजर पार्क ते संतनगर रस्ता चांगल्या स्थितीत असताना पालिका कडून उखडण्यात आला त्यास विरोध आहे. चागंले रस्ते उखडून कॉक्रीटीकरण करून पैसे उधळपट्टी करणे हा विकास नसून करदात्यांची फसवणूक आहे.” – नंदू कुलकर्णी, स्थानिक नागरिक