तळेगाव दाभाडे – बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तालुक्यातील तरुणांना रोजगार तसेच कंपनी करत असलेल्या स्वच्छता राखण्याच्या कामापासून ते औषध उत्पादन करणे, आपत्कालीन सेवा पुरविणे, घन कचरा व्यवस्थापन अशा अनेक कामांबाबत चर्चा झाली. याबाबतीत कंपनी सहकार्य करणार असल्याची ग्वाही गायकवाड यांनी दिली आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. भाताचे उत्पन्न कसे वाढेल, यातून शेतकर्यांना जास्त आर्थिक फायदा कसा होईल याचा विचार करुन आमदार शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्यासमवेत चर्चा करून सेंद्रिय पद्घतीने भात शेती कशी करता येईल, यासाठी तालुक्यातील दोन – तीन गावे दत्तक घेणार असल्याचे हणमंत गायकवाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तालुक्यात असणार्या भाकड जनावरांसाठी नवीन संजीवनी देणारी उत्पादने असल्याने त्याचा देखील तालुक्यातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी आमदार शेळके म्हणाले, मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी, शेतीमध्ये पिकाचे उत्पन्न वाढ तसेच शेतीला जोडव्यवसाय असणार्या दुधाच्या व्यवसायात उत्पन्न कसे वाढवता येईल आणि आरोग्यसेवा संदर्भातदेखील तालुक्याला बीव्हीजीकडुन काही मदत होईल का अशा विविध विषयांवर चर्चा झाली. यावर बीव्हीजीग्रुप आपल्या तालुक्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यास तयार झाल्याने त्यांचे आभार मानले.