पाणी पुरवठा विहीरीवर सौरऊर्जा यंत्रणा बसवली
लाखणगाव – पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील गावाला पाणी पुरवठा करणा-या विहिरीवर सौरऊर्जा यंत्रणा बसवल्याने गावाला महावितरणच्या विजेशिवाय पाणी मिळणार असल्याची माहिती सरपंच नीलम अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर यांनी दिली.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशनअंतर्गत १ कोटी १० लाख रुपये खर्चाची सुधारित नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचे खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले.
नवीन योजना कार्यान्वित झाली असून, विहिरीवरील मोटारीसाठी विजेचा वापर न करता सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात आले आहे. त्यावर साडेसात अश्वशक्तीची मोटार चालवण्यात येत आहे, यामुळे दर महिना सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचा वीज बिलाचा खर्च वाचला आहे. शिवाय विजेचीही बचत होणार आहे.
वीज बिलाचा खर्च वाचणार
बहुतांश वेळा भारनियमनामुळे त्रास सहन करावा लागतो, यामुळे आज सौर ऊर्जेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून किमान पाणीपुरवठा विजेविना सुरळीत सुरू राहावा यासाठी सौरऊर्जा यंत्रणा गरजेची बनली आहे, तसेच यामुळे वीज बिलावरील खर्च वाचणार आहे आणि विजेचीही बचत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .
पूर्वी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास पाणी पुरवठा योजना बंद पडत होतो. आता सौर ऊर्जेच्या पॅनेलमुळे योजना बंद पडणार नाही. जुन्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरील मोटारीसाठीही सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले आहेत.
संदीप पोखरकर, माजी उपसरपंच