पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागामधील प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या १११ पदांच्या भरती प्रक्रियेला येत्या एक जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. विद्यापीठातर्फे शनिवारी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुमारे 50 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या शिक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मात्र,राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीला मान्यता मिळाल्यामुळे विद्यापीठाने भरती प्रक्रियेला उशिरा का होईना सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या १ जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दि. ३१ जानेवारी असा आहे.
विद्यापीठात काही महिन्यांपूर्वी कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यात आली. आता पूर्णवेळ अनुदानित पदावरील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील विभागात प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. दरम्यान, ही प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरळीत राबवावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.