लोणी काळभोर मंडल अधिकारी कार्यालयाचे उदघाटन
लोणी काळभोर – लोकांची प्रलंबित कामे व जी चालू कामे आहेत ती सर्व कामे माझ्याकडून वेळेत होतील. शेतकरी बांधवाच्या फेरफारवरील तक्रारी केसेसचे कामकाज विनाविलंब करण्यात येतील, अशी ग्वाही लोणीकाळभोरच्या प्रथम मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंडल अधिकारी या नवीन कार्यालयाचे उदघाटन आज नूरजहाँ सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, हेमलता बडेकर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच प्रियांका काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर, नागेश काळभोर, सविता लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, अमित काळभोर, राजाराम काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच योगेश काळभोर म्हणाले लोणी काळभोर, कदमवाकवस्ती हि मोठी गावे आहेत. यासाठी शेतकरी, नागरिकांना थेऊर या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. लोणी काळभोर या ठिकाणी झालेले कार्यालयाचा उपयोग या ठिकाणी असलेल्या हजारो शेतकर्यांना होणार आहे.
लोणी काळभोर या नवीन सर्कल सजामध्ये लोणी काळभोर, सिद्राम मळा, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची, तरडे या तलाठी सजाचा समावेश आहे. लोणी काळभोरमध्ये नव्याने सिद्राम मळा येथे तलाठी सजा कार्यालय होणार आहे.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी योग्य पद्धतीने निर्णय घेऊन मंडलाधिकारी कार्यालय हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत आणले. यामुळे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाची, तरडे या गावातील शेतकरी, व नागरिकांची कामे सुलभतेने होतील.
-युगंधर काळभोर, माजी उपसभापती