Accident – शिर्डीला साईंचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-नगर मार्गावर पांडे गावाजवळ आज शिर्डीला जाणाऱ्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील एक आठ महिन्यांची चिमुकली ही जखमी झाली आहे.
श्रीशैल कुंभार (वय वर्ष 55), शशिकला कुंभार (50), ज्येमी दीपक हुनशामठ (38) व शारदा हिरेमठ (67) अशी मृतांची नावे आहेत. तर सौम्या कुंभार (26), कावेरी कुंभार (24), शशिकुमार कुंभार (36), श्रीदार कुंभार (38), नक्षत्रा कुंभार (वय 8 महिने) व श्रीकांत चव्हाण (26) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही भाविक हे गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात होते. यावेळी आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास करमाळ्यातील पांडे गावाजवळ हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटून पडली.
ज्यामध्ये चौघांना जागीच आपले प्राण गमवावे लागले. तर सहा जण जखमी झाले. या अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात नवीन लग्न झालेले जोडपे देखील होते. तर अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या अपघाताची माहिती समजताच पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धाव घेतल्याने जखमींना वेळेत उपचार मिळू शकले.