काका कोयटे यांनी वेधले लक्ष
पाथर्डी – शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पतसंस्थांची संख्या कमी असल्याने दोन्हीही तालुक्यात खासगी सावकारकी मोठ्या प्रमाणात फोफावली असून ती मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी पतसंस्था चळवळ फोफावणे गरजेचे आहे. त्यासाठी सहकारी संस्थांचे फेडरेशन प्रयत्न करेल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
तालुक्यातील मोहटेदेवी गडावरील भक्तीनिवासमध्ये नाशिक विभागीय सहकारी पतसंथा फेडरेशन व सहायक निबंधक कार्यालय शेवगाव व पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पतसंस्था प्रशिक्षण व पुरस्कर सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी रेणुकामाता मल्टिस्टेस्टचे अध्यक्ष प्रशांत भालेराव, नाशिक विभागीय फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, अनिरुद्ध देवचक्के, सहायक निबंधक अधिकारी गोकुळ नांगरे, स्थैर्यनिधीचे संचालक उमेश मोरगावकर, अमोल गर्जे, अमोल बडे, संतोष जिरेसाळ, रामभाऊ लाड, महेश जाधव ,प्रशांत कुलकर्णी, तुषार दारके, पांडुरंग करंजे हे उपस्थित होते. दोन्हीही तालुक्यातील नऊ पतसंस्थांना आदर्श पतसंस्था म्हणून पारितोषिक देण्यात आले.
कोयटे म्हणाले की, राज्यात येऊन परप्रांतीय संस्था सोनेतारण करत मोठा व्याजदर आकारत असून या गोष्टीचा ग्राहकांनी व संस्थाचालकांनी विचार करायला हवा. पाथर्डी तालुक्यात २३ तर शेवगाव तालुक्यात ५८ पतसंस्था असून त्यातील अनेक संस्था या क व ड वर्गात आहेत. या संस्थांच्या कारभारात सुधारणा करून पतसंथा चळवळ अधिक बळकट करायला हवी.
त्यासाठी सहकार खात्याने आणखी सहकार्य करण्याची गरज आहे. पतसंस्थांना वेअर हाऊस उभारण्यास व नफ्यातून महिला बचत गटासाठी तरतूद करण्यास सहकार खात्याने परवानगी द्यायला हवी, अशी अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक उमेश मोरगावकर, सूत्रसंचालन पांडुरंग करंजे तर आभार महेश जाधव यांनी मानले.