दहशतवादी विरोधी पथकाकडून सात जण ताब्यात : एक फरार
नारायणगाव – जुनर तालुक्यातील नारायणगाव येथे बेकायदा बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथक पुणे (एटीएस) यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने गुरुवारी (दि. 14) दिवसभर कारवाई करून सात मूळचे बांगलादेशी रहिवासी असलेल्या घुसखोरांना (सध्या रा. नारायणगाव) ताब्यात घेतले आहे तर एक फरार झाला आहे.
वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून अवैधरित्या नारायणगाव येथे वास्तव्य करताना आढळून आले. यामध्ये मेहबुल नजरुन शेख, राणा जमानअली मंडल, गफूर राजेवली शेख, आलमगीर जमान अली मंडल, शालोम मुस्तफीजूर मंडल, अफजल हमीबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत तर जमात अली व्हायतअली मंडल हा फरार आहे.
अटक केलेले बांगलादेशी नारायणगावमध्ये किती दिवसांपासून राहतात, त्यांची मतदार यादीत नावे कशी समाविष्ट करण्यात आली, रेशन कार्ड आहेत का? याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, बीएलओ तसेच बांगलादेशी ज्या घरात राहत होते त्या घराचे मालक यांची चौकशी झाली पाहिजे. नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार यादीतील बोगस नावाच्या नोंदी बाबत महसूल विभागाकडे अनेकवेळा तक्रार करुनही निर्णय घेण्यात आला नाही. आधार कार्ड काढण्यासाठी अधिकृत पुरावा देण्याचे काम सरपंच, मुख्याध्यापक, आमदार, खासदार यांना दिले होते. त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान ?
पोलिसांनी अटक केलेल्या काही बांगलादेशी नागरिकांची नारायणगावच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये नाव नोंदणी केलेली आढळून आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यांनी मतदान केले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतांच्या राजकारणात नारायणगावच्या सुरक्षिततेचा बळी दिला जात असल्याचे ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित खैरे व मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी म्हटले आहे.
आठ दिवसांपूर्वी…
आठवड्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एटीएसने पुणे, ठाणे परिसरात कारवाई करुन आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करणार्या 15 जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणात कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती.
बुधवार पेठेतून महिलांना पकडले
पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांनी बेकायदा वास्तव्य केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. तीन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करून बांगलादेशी महिलांसह साथीदारांना ताब्यात घेतले होते. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकार्यांनी मतदार यादीत बांगलादेशी नागरिकांची नावे कशी आली, आधार कार्ड व पॅन कार्ड कशी तयार केली यासंबंधी माहिती मागविल्यास सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. दोषी आढळून येणार्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. -रवींद्र सबनीस, तहसीलदार, जुन्नर