बसस्थानका बाहेरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा – आदिल शेख
नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बस स्थानकाच्या बाहेर लावण्यात आलेल्या अनाधिकृत फ्लेक्सवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आदिल शेख यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बसस्थानक परिसरात महामार्गावर मोठमोठे खड्डे घेऊन फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दुचाकी व पादचारी यांचे अपघात होऊन दुखापत झाली आहे. तसेच बसस्थानक परिसराचे विद्रूपीकरण झाले असून न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्याने महामार्ग प्राधिकारी व ग्रामपंचायत विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.
ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे म्हणाले की, ग्रामविकास अधिकारी नारायणगाव पुणे-नाशिक महामागवरील अनाधिकृत फ्लेक्समुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. फ्लेक्स प्रिंटर्स यांना वारंवार नोटीस देवून मनमानी करून वरीष्ठ कार्यालयाच्या आदेशास न जुमानता व बसडेपोची परवानगी न घेता बस स्थानकाच्या बाहेर मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड लावत आहेत. त्यामुळे वाहतूक व रस्त्याचे विद्रोपीकरण होत असल्याने बसस्थानका बाहेर लावण्यात आलेले मोठमोठे फ्लेक्स व रोवण्यात आलेले लाकडी खांब तातडीने काढून घ्यावेत, असे सांगितले आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण खेड सिन्नर यांनी सरपंच ग्रामपंचायत नारायणगाव यांना दिलेल्या पत्रानुसार फ्लेक्स प्रिंटर्स यांना नोटीस देण्यात आली आहे. पुढील काळात परवानगीशिवाय कोणतेही फ्लेक्स लावण्यात येऊ नये. अन्यथा राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याकडून योग्य ती कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– नितीन नाईकडे, ग्रामविकास अधिकारी