लोणी काळभोर – येथील 52 वर्षीय प्रगतीशील शेतकरी राजेंद्र परसराम गायकवाड यांनी जागतिक दर्जाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजेंद्र गायकवाड हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. 1991 साली गायकवाड यांच्या घरावर दरोडा पडला होता. यावेळी त्यांना बेदम मारहाण झाली होती. तब्बल 20 वर्षे वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर 2010 पासून त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. या सततच्या आजारपणाला गायकवाड कंटाळले होते.
राजेंद्र गायकवाड यांचा यशोशिखराकडे जाण्याचा प्रवास चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 पासून सुरू झाला. मोबाईलवर शरीर सौष्ठव स्पर्धेचे व्हिडिओ पाहताना एका मित्राने त्यांची शरीरयष्टी वरुन चेष्टा केली. या चेष्टेमुळे गायकवाड दुखावले गेले. त्याचवेळी चार मित्रांची तब्बल दोन लाखांची पैज लागली. ‘तू बॉडी बिल्डर होऊन दाखव’, असे आव्हान मित्रांनी गायकवाड यांना दिले आणि या गंमतीतूनच गायकवाड यांचा बॉडी बिल्डर होण्याचा प्रवास सुरू झाला.
पैज जिंकण्याच्या जिद्दीपोटी गायकवाड यांनी तातडीने त्यांचे मार्गदर्शक व कुंजीरवाडी गावचे माजी सरपंच तथा गिर्यारोहक सचिन तुपे यांची भेट घेतली. मला व्यायाम सुरु करून बॉडी बिल्डर व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सचिन तुपे, गायकवाड यांना घेऊन तीर्थक्षेत्र रामदरा डोंगर चढण्यासाठी गेले. त्यावेळी गायकवाड हे फक्त 300 मीटर डोंगर चढू शकले आणि माघारी आले.
दरम्यान, त्यांच्या सर्व मित्रांनी पुन्हा ’ही पैज तू हरणार’ म्हणत त्यांना डिवचले. गायकवाड यांनी मित्रांचे बोलणे मनावर घेत एकट्यानेच रामदरा डोंगर चढण्याचा सराव सुरू केला. राजेंद्र गायकवाड यांनी प्रशिक्षक ओमकार जगताप यांच्याकडे जीम लावली. आहार, व्यायाम व जिद्दीच्या जोरावर वजन नियंत्रित केले. गोवा येथे नुकतीच जागतिक दर्जाची ’मी नैसर्गिक’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत राजेंद्र गायकवाड हे पहिल्यांदाच सहभागी झाले होते. गायकवाड यांनी या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.