पुणे – ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत पुरावे असतील, तर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. ससून रुग्णालयाच्या गेटवरून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
त्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी यांचा अमली पदार्थ तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले नाही. आरोपीच्या संरक्षणसाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी यांना बडतर्फ केले आहे. सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.
तर, डॉ. ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ललित पाटील विविध व्याधीने ग्रस्त होता. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका अशा स्वरूपाची धमकी ससूनचे अधिष्ठाता यांनी तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दिल्याची तक्रार आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या प्रश्नांच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, भाई जगताप, राजहंस सिंह, अनिल परब, अरुण लाड यांनी सहभाग घेतला.
…हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र
अमली पदार्थ तस्करी हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून याचे पुरावेही सापडले आहेत. इतर राज्यांच्या समन्वयाने कारवाई करण्यात येत आहे. हुक्का पार्लर बंद करण्यात आले आहेत. सर्व सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या प्रकरणातील कोणासही पाठीशी घातले जाणार नाही. भावी पिढीचे भवितव्य महत्त्वाचे असल्याने सरकार ही लढाई लढत राहणार असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.