पारनेर – यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या फेलोशिपसाठी पुणे महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय रामवाडी येथील शिक्षिका स्वरदा पांडुरंग खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. या फेलोशीप अंतर्गत कृषी साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रोत्साहन दिले जाते.
फेलोशिप प्रदान करण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे, एमकेसीएलचे विवेक सावंत तसेच निवड समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. वीस प्राथमिक शिक्षकांमध्ये स्वरदा खेडेकर यांची निवड झालेली आहे. स्वरदा खेडेकर यांना यापूर्वी मायक्रोसॉफ्टचा इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट पुरस्कार सलग आठ वर्षे मिळत आहे. स्वरदा खेडेकर यांचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (एससीईआरटी) तसेच बालभारती येथील अनेक उपक्रमांमध्ये नेहमी सक्रिय सहभाग असतो.