पुणे – लाल रंगाची, गोड़-आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्राॅबेरीला यंदा हवामान बदलाचा फटका बसला आहे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे यंदा स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. लागवड तर कमी झालीच आहे. पण, त्याचबरोबर वातावरणातील बदलांमुळे प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत आवक कमी होत आहे.
दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्ट्राॅबेरीचा हंगाम सुरू होतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात फळबाजारात स्ट्राॅबेरीची तुरळक आवक सुरू होते. डिसेंबरमध्ये स्ट्राॅबेरीच्या मागणीत वाढ होते. नाताळ सणात स्ट्राॅबेरीला देशभरातून मागणी असते. स्ट्राॅबेरीची लागवड सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, पाचगणी, भिलार परिसरात होते. पुणे जिल्ह्यातील भोर, तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्ट्राॅबेरीची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
स्ट्राॅबेरीचा हंगाम सुरू झाल्यानंतर यंदा कडाक्याची थंडी पडली नाही. नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाला. ढगाळ वातावरण, वातावरणातील उष्मा, तसेच थंडी न पडल्याने स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. दरवर्षी फळबाजारात डिसेंबर महिन्यात स्ट्राॅबेरीची आवक वाढते. मार्केट यार्डातील फळबाजारात साधारणपणे पाच ते सात हजार प्लॅस्टिक ट्रेची आवक वाई, महाबळेश्वर, भिलार भागातून होते.
यंदा स्ट्राॅबेरीची लागवड कमी झाली आहे. सध्या बाजारात दररोज दोन हजार स्ट्राॅबेरी ट्रेची आवक होत आहे. एका ट्रेमध्ये पावणेदोन ते दोन किलो स्ट्राॅबेरी असते. घाऊक बाजारात स्ट्राॅबेरीच्या एका ट्रेला १५० ते २०० रुपये भाव मिळाले आहेत. गेल्या वर्षी स्ट्राॅबेरीच्या ट्रेला २५० रुपये दर मिळाला होता.
“यंद थंडी कमी पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून लागवड कमी झाली आहे. फळाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. सातारा जिल्ह्यातून स्ट्राॅबेरीची आवक अपेक्षेएवढी होत नाही. भोर तालुक्यातील केळवडे, खेड शिवापूर परिसरातून स्ट्राॅबेरीची आवक बाजारात होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्ट्राॅबेेरीला भावही कमी मिळाले आहेत.” – युवराज काची, व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड