शिक्रापूर पोलीस व गोरक्षकांची सतर्कता
चार वाहने जप्त; चौघे अटक
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच गोरक्षकांच्या सतर्कतेने कत्तलीसाठी चाललेल्या तेरा गोवंशांना जीवदान देत गोवंश गोशाळेत रवाना केले. चारही वाहने जप्त करीत कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहेत.
चंद्रकांत भिमाजी पोटवडे, विकास किसन पोटवडे, सत्यवान ज्ञानेश्वर पोटवडे व अशोक नाथा पोटवडे, असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्यांची नावे आहेत.
शिक्रापूर पोलिसांचे पथक रात्रगस्त घालत असताना खेड बाजूने पाबळच्या दिशेने काही वाहनांतून काही गोवंश कत्तलीसाठी चालले असल्याबाबतचा फोन पोलीस शिपाई अविनाश पठारे यांना आला. दरम्यान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस हवालदार लहानू बांगर, पोलीस शिपाई अविनाश पठारे, लखन शिरसकर, गोरक्षक अभिषेक कडूसकर, शिवप्रसाद रोकडे, मंगेश नटके, वैभव थोरवे यांनी पाबळ गावातील खेड रोडलगत सापळा रचला. त्यांना चार वाहने आल्याचे दिसून आले.
दरम्यान पोलीस व गोरक्षकांनी चारही वाहनांची तपासणी केली असता प्रत्येक वाहनामध्ये जनावरे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी चारही वाहने जप्त करीत तेरा गोवंशांना गोशाळेत दाखल केले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र किसन बनकर यांनी फिर्याद दिली आहे.